डॉ. आंबेडकरांना कृतिशील अभिवादन : रत्नागिरीत ‘वही–पेन’ शैक्षणिक साहित्य अभियानाला सुरुवात

महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद अपेक्षित

रत्नागिरी, दि. ०४ : सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी यांचा उपक्रम म्हणून ‘वही–पेन शैक्षणिक साहित्य अभियान’ यंदा दुसऱ्या वर्षी राबवण्यात येत आहे. महापुरुषांच्या आदर्शांकडून प्रेरित होत समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश असून, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा अभियानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संस्थेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे ६ डिसेंबर रोजी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने येऊन अभिवादन करतात. फुले, हार, मेणबत्त्या यांसारख्या नाशवंत वस्तूंचा जमाव आणि त्यातून निर्माण होणारा कचरा लक्षात घेता, समाजहिताचा विचार करून ‘वही–पेन’ या उपयुक्त साहित्याच्या माध्यमातून अभिवादन करण्याचे आवाहन संस्थेने यावर्षीही केले आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षणाचा मूलमंत्र समाजाला दिला. त्याच शिक्षणपरंपरेचा वारसा जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी थोडेसे योगदान देण्याची संधी या अभियानातून निर्माण होत आहे.

५ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता सुरू होणारा हा उपक्रम ६ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जमा झालेले शैक्षणिक साहित्य संस्थेच्या माध्यमातून ओळखल्या गेलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. मागील वर्षी झालेल्या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या सहभागामुळे शेकडो विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि अन्य साहित्य उपलब्ध झाले. यंदाही हा उपक्रम अधिक व्यापक होईल, असा विश्वास संस्थेचे चंद्रमणी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांनी समाजाप्रती कृतज्ञता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन म्हणून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या अभियानासंबंधी मदत, साहित्य जमा करण्यासाठी किंवा इतर माहितीकरिता इच्छुकांनी संस्थेच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हा शासकीय रुग्णालयाशेजारी, रत्नागिरी
वेळ: ५ डिसेंबर २०२५, सायं. ६.०० ते ६ डिसेंबर २०२५, सायं. ६.००
कार्यालय: कॉमन मॅन ऑनलाईन सर्व्हिस सेंटर, एस.टी. स्टँड समोर, तक्षशिला पतसंस्था शेजारी, पाली, रत्नागिरी
संपर्क: चंद्रमणी सावंत – 7875311875, अमर पवार – 7066220814

आणखी वाचा