रत्नागिरी, दि. ०७ : बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी सजग राहून आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले. जन्मजात बालकांमध्ये श्रवणदोष अनुवंशिक रित्या होऊ नये यासाठी मूकबधिर दाम्पत्यांनी मूल जन्माला घालण्यापूर्वी जेनेटिक कौन्सिलिंग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद येथे जागतिक श्रवण दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त दिलेल्या संदेशात त्या बोलत होत्या. नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे वेळीच निदान व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये श्रवणदोष तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. शासकीय तसेच खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाची श्रवण चाचणी करणे आवश्यक असून यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच माता-पित्यांनीही जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयातील कान-घसा तज्ज्ञ डॉ. वैभवी व्यास, वाचा उपचार तज्ज्ञ अभिषेक गांधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे, विशेष शिक्षिका श्रीमती मयेकर, मुख्याध्यापक गजानन राजपूत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या व्यवस्थापक आरती कदम यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
समाजातून शाळेकडे प्रत्येक मुलासाठी श्रवण आरोग्य या जागतिक थीमविषयी प्रस्तावनेत सुनिता शिरभाते यांनी माहिती दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या व्यवस्थापक आरती कदम यांनी श्रवणदोष असलेल्या बालकांसाठी उपलब्ध असलेल्या संदर्भ सेवा योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये नवजात बालकांच्या श्रवणदोष तपासणीची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. कश्मीरा चव्हाण यांनी श्रवणदोष प्रतिबंधाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर वाचा उपचार तज्ज्ञ प्राजक्ता भोगटे व सातवसे यांनी श्रवणदोषाचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी दिव्यांग सक्षमीकरण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्रवणबाधित दिव्यांगांच्या समस्या, विविध शासकीय योजना आणि पुनर्वसनाबाबत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी उपस्थितांशी चर्चा केली.
कार्यक्रमात कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर मुख्य प्रवाहात आलेल्या आर्या सुशांत रेवाळे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रभावी भाषण केले. तसेच कै. के. पी. अभ्यंकर मूकबधिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रवणदोष असलेल्या बालकांची व प्रौढांची आस्था फिरत्या श्रवणदोष चाचणी केंद्रामार्फत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी साईन लँग्वेज इंटरप्रीटर म्हणून सीमा मुळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजेश गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कक्षातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संजय बलाढ्ये यांनी केले. कार्यक्रमाला दिव्यांग, पालक तसेच विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








