ईगल तायक्वांदोच्या खेळाडूंच्या यशाचे नगरसेवक राजीव कीर यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी, दि. २७ : अभ्युदय नगर, नाचणे रोड येथे कार्यरत असलेल्या ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक श्री. राजीव कीर यांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक श्री. राजीव कीर यांनी अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृह, नाचणे रोड येथे सुरू असलेल्या ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या कामगिरीची माहिती घेतली. नुकत्याच पार पडलेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत केंद्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वैष्णव रोहित कार्लेकर आणि कशिश अभय जैन यांनी येलो बेल्ट प्राप्त केला, तर नायशा मयूर कांबळे हिने ब्लू वन बेल्ट मिळवून विशेष यश मिळवले आहे.

या खेळाडूंना प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत आणि सई संदेश सावंत यांच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाला असून त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच हे यश शक्य झाल्याचे नगरसेवक श्री. कीर यांनी नमूद केले. या यशाबद्दल नगरसेवक श्री. राजीव कीर यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. प्राची राजीव कीर, उपशहर प्रमुख सौ. प्रिया प्रकाश साळवी तसेच उपस्थित सहकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना नगरसेवक श्री. राजीव कीर यांनी ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राला भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आपण सदैव पाठीशी उभे राहू, असे आश्वासन दिले. तसेच आजच्या काळात स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेता परिसरातील जास्तीत जास्त मुलांनी आणि मुलींनी या तायक्वांदो प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून परिसरातील मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले जात असून भविष्यातून अधिकाधिक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आणखी वाचा