निवळी बौद्धवाडीत जाणारा रस्ता दुसऱ्यांदा अडविण्याचा प्रकार; चिरे टाकून मार्ग बंद, ग्रामस्थ आक्रमक

रत्नागिरी, दि. १७ (प्रतिनिधी) : रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा एकदा चिरे टाकून अडविण्यात आल्याची घटना सोमवारी (१६ मार्च) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बौद्धवाडीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

रस्त्यावर मोठे चिरे टाकून मार्ग बंद करण्यात आल्याचे लक्षात येताच बौद्धवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. “जोपर्यंत पोलिस प्रशासन येथे येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही,” असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत रस्त्यातील चिरे बाजूला करून मार्ग पुन्हा मोकळा केला. मात्र हा प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वीही याच रस्त्यावर अशाच प्रकारे अडथळा निर्माण करण्यात आला होता. त्यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संशयितांची नावेही देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “त्या वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर आज पुन्हा हा प्रकार घडला नसता,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील पवार तसेच तलाठी कवाळे घटनास्थळी दाखल झाले. वारंवार सार्वजनिक रस्ता अडवण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर तपास करूनही प्रकरणाचा छडा लागत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः या घटनेत लक्ष घालावे, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक मार्ग अडवून नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा