रत्नागिरी, दि. ३० : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून आज शहरात रूट मार्च घेण्यात आला. यासोबतच वाहन तपासणी मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणारे बदल केलेले सायलेंसर्स जप्त करण्यात आले.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत आज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत राज नगर मरकज–पैजाने अत्तार मदरसा–श्रीराम चौक–कदमवाडी–कीर्ती नगर–जामा मशीद–अलिशान कॉर्नर–क्रांतीनगर मार्गे पुन्हा राज नगर मरकज मैदानापर्यंत रूट मार्च पार पडला.
या रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, १० पोलीस अंमलदार, १ एसआरपीएफ पथक, ७० पोलीस कर्मचारी आणि ६६ होमगार्ड यांनी सहभाग घेतला. निवडणूक पूर्वकाळातील शांतता, सुव्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर रूट मार्चचा मुख्य भर होता.
दरम्यान, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत वाहन तपासणी मोहीमही राबविण्यात आली. या मोहिमेत एका दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, कर्कश आवाज करणारे ‘मॉडिफाइड’ सायलेंसर्स जप्त करण्यात आले. संबंधित वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.








