रत्नागिरी, दि. ३० : रत्नागिरी रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडता-घडता थोडक्यात टळली. चालत्या गाडीतून बेपर्वाईने उतरायचा प्रयत्न करणारा एक तरुण प्लॅटफॉर्मवर पडला आणि काही क्षणातच ट्रेनखाली जाण्याची वेळ आली होती. परंतु, आरपीएफ जवान आणि एका खाद्यविक्रेत्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले.
शनिवारी सकाळी ६.४१ वाजता एलटीटी–सावंतवाडी ही गाडी रत्नागिरी स्थानकाच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर दाखल होत असताना ही घटना घडली. गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वीच एक तरुण उतरण्याचा प्रयत्न करत होता. तोल जाऊन तो खाली पडला आणि ट्रेनच्या चाकाखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली.
मात्र, त्या वेळी प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच खाद्यविक्रेता वीरसिंग यांनी क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन त्या तरुणाला ओढून सुरक्षित बाजूला केले. त्यामुळे मोठा अपघात टळला.
अपघातग्रस्त तरुण हा गोळप, रत्नागिरी येथील रहिवासी असल्याची माहिती त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळाली आहे. पडल्यामुळे किरकोळ जखमी झालेल्या या तरुणाला कोकण रेल्वेच्या पथकाने तातडीने प्रथमोपचार दिला आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यात जवान आणि विक्रेत्याने दाखवलेली तत्परता स्पष्टपणे दिसते.
घटनेची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करून ते तात्काळ प्रदान करण्यात आले.