रत्नागिरी, दि. ९ : धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील बहुप्रतीक्षित धामणसे-हटवाडी पुलाचे काम पूर्ण झाल्याने परिसराच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. निसर्गरम्य वातावरण, सोमगंगा नदीचे सौंदर्य आणि नव्या पुलामुळे हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत. या परिसरातील छायाचित्रे व चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.
पुलाचे भूमिपूजन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय दूर करण्याबरोबरच जलसंधारण आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

सोमगंगा नदीतील गाळ काढल्याने जलसाठ्यात वाढ
पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समिती आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सोमगंगा नदीतील गाळ काढण्याचे काम करण्यात आले. गाळ काढल्यामुळे नदीची जलधारण क्षमता वाढली असून, परिसरातील विहिरींमध्येही पाण्याची उपलब्धता वाढली आहे. याचा फायदा शेती, पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक जलस्रोतांना होत असल्याचे सांगण्यात आले.
किरण सामंत यांनी घेतला जलपर्यटनाचा आनंद
रत्नागिरी-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी धामणसे-हटवाडी पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोमगंगा नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत परिसराचा अनुभव घेतला. या भागात पर्यटनाची मोठी क्षमता असून, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. पुलाजवळ आवश्यक सुविधांसाठी वास्तुविशारदामार्फत आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनीही या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले. पुलाच्या कामासाठी त्यांचे तसेच अनिकेत पटवर्धन यांचे मार्गदर्शन व पाठपुरावा लाभला. धामणसेचे सुपुत्र, भाजप कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनाही यश मिळाले.
स्थानिक महिलांना रोजगार
पुलाजवळ बचतगटांच्या महिलांनी वडापाव, भजी, चहा, मिसळ आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केले आहेत. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या असून, ग्रामीण पर्यटनाला चालना मिळत आहे.
धामणसेचे सरपंच अमर रहाटे यांनी पर्यटकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे, नदीतील पाण्याचा अंदाज घेऊनच जलपर्यटनाचा आनंद घेण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, कचरा करणे तसेच वाद घालणे टाळावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि सुमारे ५०० ते ७०० पर्यटक उपस्थित होते.








