रत्नागिरी, दि. ०९ (प्रतिनिधी): जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आस्था सोशल फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आस्था दिव्यांग प्रेरणा पुरस्कार’ यंदा हरहुन्नरी आणि जिद्दीचे प्रतीक ठरलेल्या धीरज राजेंद्र साठविलकर यांना प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान झाला.
या पुरस्कारामध्ये पाच हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्हाचा समावेश होता. कार्यक्रमाला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, ऍडव्होकेट यतीन धुरत तसेच आस्था सोशल फाउंडेशनच्या सचिव सुरेखा पाथरे उपस्थित होत्या. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या दरम्यान धीरज साठविलकर यांनी आपल्या पायाने मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे तैलचित्र काढून त्यांना भेटस्वरूप दिले. या अनोख्या कलाकृतीचे संपूर्ण सभागृहात कौतुक झाले. दिव्यांग असूनही विलक्षण कलाविष्कार आणि जिद्दीच्या जोरावर घडविलेल्या धीरज यांच्या प्रयत्नांनी कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर भारावून गेले. धीरज यांच्या कलाप्रवासाला आणि प्रेरणादायी वाटचालीला हा पुरस्कार नवी उंची देणारा ठरला आहे.








