रत्नागिरी, दि. ३१ : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरीतर्फे ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या “रतनजी टाटा वाहन कर्ज” योजनेस मोठा प्रतिसाद मिळाल्याने या योजनेची मुदत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
बँकेमार्फत स्वतःच्या वापरासाठी दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीसाठी ही कर्ज योजना दि. १० ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली होती. सुरुवातीला या योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, ग्राहकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून बँकेच्या संचालक मंडळाच्या दि. २५ मार्च २०२६ रोजी झालेल्या सभेत या योजनेची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार, “रतनजी टाटा वाहन कर्ज” योजनेचा कालावधी आता दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बँकेने आपल्या सर्व ग्राहक, खातेदार व हितचिंतकांना या योजनेची नोंद घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी बँकेच्या जवळच्या शाखेशी किंवा कार्यक्षेत्रातील प्राथमिक शेती संस्थेशी संपर्क साधावा, असेही बँकेकडून कळविण्यात आले आहे.








