चिपळूण, दि. ०१ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्य येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. या ठिकाणी सुमारे तास ठिय्या मांडून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे. ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची पुरोगामी विचारधार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटा विरोधात राज्य भरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवर ही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. केवळ आपल्या मतदार संघा पुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत. आमदार म्हणून विधान सभेत आणि रस्त्यावरची लढाई ही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते. राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला.
पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे.
या पूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला तरी आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकार विरोधात वातावरण निर्मिती केली. त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकार कडून सूडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या विरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते धोकादायक आहे.
आज आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकारणा वरून केली जात आहे त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहीली तर त्या पैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमर सिंह पंडीत, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजय सिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे. शिवाय या बरखास्त संचालक मंडळा विरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु या सर्वां भोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही परंतु आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात असून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याचा हा प्रकार आहे. तसेच ना बार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा २०१० चा असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा २०१२साली लिलावा मध्ये ५०.२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे. त्यामुळे राज्य बँके कडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुरान्वये ही संबंध नाही. शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकार कडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. या विरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकार विरोधात घोषणाबाजी निषेध केला. या आंदोलनात जेष्ठ नेते पक्षाचे उपाध्यक्ष व *माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम, विधानसभा उमेदवार प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष मुरादभाई अडरेकर, महिला जिल्हाध्यक्षा दिपिकाताई कोतवडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईसभाई अल्वी, माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, अजमलभाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताशेठ पवार, जिल्हा चिटणिस रोहन चौधरी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महमद पाते, ओबीसी तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, महिला तालुकाध्यक्ष राधाताई शिंदे, शहराध्यक्ष रतनदादा पवार, युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नियाज पाते, महिला शहराध्यक्षा रेहमत जबले, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, अर्बन बँक माजी चेअरमन सतिशआप्पा खेडेकर, शहर उपाध्यक्ष संजय तांबडे, भाई गुढेकर, मंदार चिपळूणकर, कादीर मुकादम, माजी नगरसेवक राजूशेठ कदम, फैसल पिलपिले, गुलझार कुरवले, राकेश दाते, फिरोज चौघुले अन्वर जबले, वासुआप्पा मेस्त्री, सिद्धिराज पाथरे, दिनेश शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते.
‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. आमदार रोहित दादा पवार हे ही आदरणीय शरद पवार साहेबां सोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्याय कारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना शरण जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजप सोबत पळूनही जाणार नाही तर कठोर संघर्ष करू, लढू आणि जिंकू.








