रत्नागिरी दि. 24 : शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल करत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दोन ज्येष्ठ नेत्यांकडे नवी जबाबदारी सोपवली आहे. लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्याकडे धाराशीव जिल्हा संपर्कप्रमुख, तर दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्याकडे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची धुरा दिली आहे.
राज्यातील जिल्हानिहाय संपर्कप्रमुखांची नवी यादी जाहीर करताना शिंदे यांनी दोन्ही माजी आमदारांवरील विश्वास व्यक्त केला. पक्ष विस्तार, संघटन बळकटी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व निर्मिती या उद्दिष्टांसाठी ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. कोकणातून साकारलेल्या नेतृत्वाला राज्यव्यापी पातळीवर भूमिका देत संघटनेला गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे पक्षातील सूत्रांचे मत आहे.
नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी आमदार संजय कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. “पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मान आहे. संघटनवाढ आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन,” असे ते म्हणाले. दुसरीकडे, राजन साळवी यांच्याकडेही आता कोकणाबाहेरील जिल्ह्यात पक्षविस्ताराचे कार्य येणार असल्याने त्यांच्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा शिवसेनेला होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नियुक्त्यांमुळे कोकणातील दोन माजी आमदारांची भूमिका राज्यस्तरावर अधिक प्रभावी होणार आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक समीकरणात कोकणी नेतृत्वाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचे मानले जात आहे.








