खारफुटी अभ्यास सहलीने सागर महोत्सवाची सांगता

रत्नागिरी, दि. १४ (प्रतिनिधी): कर्ला ते चिंचखरी या भागात विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या खारफुटी जंगलाची माहिती घेत आणि खारफुटी जंगलांचे संवर्धन करण्याची शपथ घेत आज आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. या खारफुटी अभ्यास सहलीत सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि पर्यटकांनी भाग घेतला. यात डॉ. विनोद धारगळकर आणि गोदरेज मॅंग्रूव्हजचे हेमंत कारखानीस यांनी खारफुटी, खाडी किनारी दिसणारे पक्षी, जैवविविधता आदींची सुरेख माहिती दिली.

सागर महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता कर्ला येथील जेट्टीवरून होडीतून खारफुटी जंगल सहलीस सुरवात झाली. सुरवातीला डॉ. धारगळ

कर यांनी सांगितले की, खाऱ्या व गोड्या पाण्यात राहणारी खारफुटी झाडांची मुळे, पाने वेगवेगळी असतात. खारफुटी वनस्पतींची जंगले वाढण्याची गरज आहे. भरती, ओहोटीच्या काळातही ही खारफुटी तग धरून राहू शकते. येथे अनेक प्रकारचे प्राणी वास्तव्याला येतात. यात अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, मासे, खेकडे, जलचर यांसह खारफुटीची पाने खाण्यासाठी 

वानरही येतात. खारफुटी वनस्पती हवेतील कार्बन शोषून घेते. प्रदूषण रोखू शकते. त्सुनामी आली तरीही खारफुटी समुद्राचे आक्रमण रोखून धरू शकते. प्रत्येकाने किमान 

 

१० खारफुटीची झाडे लावावीत. झाडे थोडी वाढली की ती तुम्ही आवश्यक त्या ठिकाणी लावा. ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल तेव्हा जगलेली, मोठी झालेली झाडे पाहून तुम्हाला आनंद होईल. माती, चिखलाच्या जमिनीत वाढलेली खारफुटी झाडे जमिनीची धूप थांबवतात त्यामुळे खाड्यांमध्ये भूभाग (बेट) वाढू लागला आहे. आपण जो ऑक्सिजन घेतो तो ६० टक्के झाडांमुळे येतो. तुम्हाला जगायचे असेल तर झाडे लावलीच पाहिजेत. प्रदूषण कमी करा. खारफुटीची तोड करणे हा कायद्याने गुन्हा असून त्याकरिता कडक शिक्षा दिली जाते.

सफरी दरम्यान, ब्राह्मणी घार, बगळा, पाणकावळा, कावळे पाहायला मिळाले. ब्राह्मणी घारी मोठ्या प्रमाणावर या परिसरात पाहायला मिळतात. खारफुटीच्या झाडांवरच त्या बसलेल्या पाहायला मिळतात. खारफुटीची पांढरी फुले, शेंगा यासुद्धा दिसल्या. जिथे जिथे खारफुटी आहे तिथे निसर्ग टिकून आहे. कर्ला येथील सुशेगाद जलविहारच्या संजीव लिमये व कौस्तुभ लिमये यांचे या सहलीकरिता सहकार्य लाभले.

आसमंत फाउंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन, संचालक नितीन करमरकर, पुरुषोत्तम पेंडसे, जगदीश खेर श्रीप्रसाद देशमुख आदींसह अभ्यासक, पर्यावरणप्रेमींनी या सहलीत भाग घेतला.

गोदरेज मॅंग्रूव्हजने कर्ला, चिंचखरी, हातीसपर्यंतच्या खारफुटी जंगलावर अभ्यासपूर्ण लघुपट साकारला आहे. या लघुपटातून खारफुटी जंगलांची आवश्यकता अधोरेखित होते. अतिशय सुरेख चित्रीकरणातून खारफुटीचे महत्त्व आणि पर्यावरणातील प्रभावशाली घटक असे स्वरूप पाहायला मिळाले. यासंबंधीची माहिती हेमंत कारखानीस यांनी दिली.

आणखी वाचा