करजुवे–वातवाडी येथे अवैध वाळू उपसा; तीन जणांवर गुन्हा, ३२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर, दि. ८ : करजुवे–वातवाडी परिसरातील कापशी नदीपात्रातून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केली असून तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी मंडळ अधिकारी सागर अनंत करंबेळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी आरोपी सुरज उदय नलावडे याने कापशी नदीतून अंदाजे २५ ब्रस वाळू बेकायदेशीररीत्या काढून ठेवली होती. अंदाजे दोन लाख पंचावन्न हजार रुपये किंमतीची ही वाळू नदीकाठावर साठवली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी शकील अहमद आणि राजकुमार प्रजापती हे घटनास्थळी येऊन संगनमताने वाळूचे लोडिंग आणि वाहतूक करत असल्याचे पोलिसांना दिसून आले.

या कारवाईत पोलिसांनी २५ ब्रस वाळू, जेसीबी (MH09/CL/0507) आणि डंपर (MH08/W/8724) असा एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. माखजन पोलिस दुरक्षेत्रात अकरांस नंबर ६२/२०२५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून ही कारवाई मपोहेकॉ के. आर. सावंत यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संगमेश्वर तालुक्यात अलीकडच्या काळात वाढत्या अवैध वाळू उत्खननाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा