धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; संगमेश्वर स्थानकावर शेंबवणेतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

संगमेश्वर, दि. ४ : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात शेंबवणे येथील ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिल बाळू बांबाडे (रा. शेंबवणे-गोमाणेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे शेंबवणे गावावर शोककळा पसरली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १.४० वाजता संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर आली होती. मुंबईला नोकरीसाठी जाण्यासाठी अनिल बांबाडे स्थानकावर आला होता. गाडी सुटत असताना त्याने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक त्याचा तोल गेला आणि पाय घसरल्याने तो फलाट व धावत्या रेल्वेच्या मधील अरुंद पोकळीत कोसळला. हा थरार पाहून स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

अपघात होताच स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई बुरकुले यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य सुरू केले. स्टेशन मास्तरांकडून आवश्यक लेखी मेमो घेत त्यांनी वेळ न दवडता जखमी अनिलला खाजगी रिक्षाने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र गंभीर दुखापतीमुळे दुपारी ३.४० वाजता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवघरे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अनिल बांबाडे हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. कष्टाळू आणि शांत स्वभावाचा म्हणून तो परिसरात परिचित होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शेंबवणे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कितीही घाई किंवा गर्दी असली तरी धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. रेल्वे पूर्णपणे थांबल्यानंतरच चढावे-उतरावे आणि रेल्वे प्रशासनाने घालून दिलेल्या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. क्षणिक घाईमुळे मौल्यवान जीव धोक्यात येऊ शकतो, याची जाणीव प्रत्येक प्रवाशाने ठेवावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

आणखी वाचा