संगमेश्वर रोड स्थानकावर चार गाड्यांना प्रायोगिक थांबा; प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी

संगमेश्वर, दि. २२ : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना थेट लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत.

कोकण रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, एकूण चार एक्सप्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. यामध्ये जामनगर–तिरुनेलवेली, तिरुनेलवेली–जामनगर, पोरबंदर–तिरुवनंतपुरम नॉर्थ आणि तिरुवनंतपुरम नॉर्थ–पोरबंदर या गाड्यांचा समावेश आहे.

गाड्यांचे तपशील पुढीलप्रमाणे :
19578 जामनगर–तिरुनेलवेली एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) – 26 डिसेंबर 2025 पासून दुपारी 3.30 ते 3.32 या वेळेत संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा.
19577 तिरुनेलवेली–जामनगर एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) – 29 डिसेंबर 2025 पासून सकाळी 9.00 ते 9.02 या वेळेत थांबा.
20910 पोरबंदर–तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस (साप्ताहिक) – 25 डिसेंबर 2025 पासून दुपारी 3.30 ते 3.32 या वेळेत थांबा.
20909 तिरुवनंतपुरम नॉर्थ–पोरबंदर एक्सप्रेस (साप्ताहिक) – 28 डिसेंबर 2025 पासून सकाळी 9.00 ते 9.02 या वेळेत थांबा.

हा निर्णय प्रायोगिक स्वरूपाचा असून, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गाड्यांच्या सविस्तर थांब्यांची माहिती व वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी KR Mirror App डाउनलोड करण्याचेही प्रशासनाने सुचविले आहे. या निर्णयामुळे संगमेश्वर आणि परिसरातील प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, दीर्घकाळापासून असलेली मागणी अखेर पूर्ण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आणखी वाचा