सातारा, दि. २१ : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून भाजपला सत्ता मिळाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते,” असा घणाघात त्यांनी केला.
भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदी तर राजू भोसले उपाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही सदस्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याने सत्तांतर घडल्याचे त्यांनी नमूद केले.
गोरे म्हणाले, “पालकमंत्री विनाकारण आकांडतांडव करत आहेत. मोठा ताफा घेऊन फिरणे, पोलिसांवर दबाव टाकणे ही त्यांची कार्यपद्धती झाली आहे. चौकात पोलीस दिसला नाही तर निलंबनाच्या धमक्या दिल्या जातात. पोलीस अधीक्षकांशी बोलतानाही ते अयोग्य भाषेत संवाद साधतात, हे निंदनीय आहे.”
जिल्हा परिषद निवड प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “ही फक्त अध्यक्षांची निवडणूक असताना पालकमंत्र्यांना सभागृहात जाण्याची काय गरज होती? जिल्हा परिषद इतिहासात अशा प्रकारची बैठक यापूर्वी झाली नव्हती,” असे ते म्हणाले.
तसेच, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सदस्यांना सभागृहात नेण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला. “जर आपल्या सदस्यांवर विश्वास नव्हता, तर त्यांना ४५ दिवस का रोखून ठेवले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शेवटी त्यांनी इशारा देत म्हटले की, “पाटण आणि वाईमध्ये काय सुरू आहे, हे जनतेला माहीत आहे. जे पेरलंय ते कधीतरी उगवणारच.”
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे २७ सदस्य विजयी झाले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, शिवसेनेचे १५, काँग्रेसचा १, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा १ आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.








