चिपळूण, दि. ११ : चिपळूण तालुक्यातील रामपूर परिसरातील बहुप्रतिक्षित शिरवली-येलोंडेवाडी धरण प्रकल्प अखेर पूर्णत्वास गेला असून, यंदाच्या पावसामुळे धरणात १५.२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. सुमारे २२५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प परिसरातील भूजल पातळी वाढविण्यासह भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
शिरवली, येलोंडेवाडी, देवखेरकी आणि नारदखेरकी परिसरातील सुमारे १४२ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. धरणाची लांबी ७०० मीटर, तर उंची ४५ मीटर आहे. या प्रकल्पाची निविदा २००७ मध्ये काढण्यात आली होती. विविध प्रशासकीय प्रक्रियांनंतर २०१८ ते २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण झाले.
धरणासाठी देवखेरकीतील ४७ आणि शिरवली-येलोंडेवाडीतील ८२, अशा एकूण १२९ जणांचे स्वेच्छा पुनर्वसन करण्यात आले. भूसंपादनासह संपूर्ण प्रकल्पावर २२५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
दरम्यान, धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेर असलेल्या १०९ घरांतील नागरिकांनीही शासनाकडे स्वेच्छा पुनर्वसनाची मागणी केली आहे. पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढल्यास आपल्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नुकसानभरपाईसह पुनर्वसन करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने देवखेरकी सुतारवाडी आणि शिरवली गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारली असून, शिरवली गावात अंतर्गत डांबरी रस्त्यांची कामेही पूर्ण केली आहेत. मात्र, येलोंडेवाडी ग्रामस्थांनी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची मागणी केली आहे.
प्रकल्प अधिकारी खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील सध्याचा १५.२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत करणार असून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाचे कार्यालय नारदखेरकी येथे असून सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे.








