रत्नागिरी जिल्ह्यात ३० जूनपासून मतदार यादीचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ कार्यक्रम

रत्नागिरी, दि. २५ : लोकशाही प्रक्रियेत मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक राहावी या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार असून जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाने या विशेष मोहिमेसाठी सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीवर नागरिकांना ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांवर ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सुनावणी व निर्णय प्रक्रिया पार पडणार असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे नाव मतदार यादीत आहे का, याची खात्री करून घ्यावी. नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशीलांमध्ये तफावत असल्यास ती वेळेत दुरुस्त करणे आवश्यक आहे. तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यास संबंधित मतदारांना प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात येईल. अशावेळी जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र किंवा शासनमान्य ओळखपत्र यापैकी कोणताही एक वैध पुरावा सादर करावा लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून बीएलओ घरोघरी भेट देणार असल्याने आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध ठेवावीत, असे सांगितले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. दापोलीसाठी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, गुहागरसाठी वैशाली पाटील, चिपळूणसाठी आकाश लिगाडे, रत्नागिरीसाठी जीवन देसाई आणि राजापूरसाठी विश्वजीत गाताडे यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येणार आहे.

मतदार यादीतील अचूकता ही सुदृढ लोकशाहीचा पाया असल्याने प्रत्येक नागरिकाने या विशेष पुनरिक्षण मोहिमेत सहभाग घेऊन आपली नोंद योग्य असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आणखी वाचा