मुंबई, दि. २४ : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा–राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या पुढाकाराने शिक्षण मंत्रालयात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भूषविले.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण संचालक पानझडे, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी उपस्थित होते. याशिवाय रत्नागिरी जिल्हा प्राथमिक व माध्यमिक समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिनांक 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि त्याचे दुष्परिणाम मांडले. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत, नितेश राणे आणि आमदार किरण सामंत यांनी कोकणाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्याने या भागासाठी स्वतंत्र निकष तयार करण्यात यावेत, अशी ठाम भूमिका मांडली.
समन्वय समितीच्या वतीने दिलीप देवळेकर व सागर पाटील यांनी संच मान्यता व शिक्षक समायोजनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याचा भौगोलिक आराखडा आणि शैक्षणिक प्रगतीबाबत सविस्तर माहिती शिक्षणमंत्र्यांसमोर सादर केली.
उपस्थित सर्व मंत्री व आमदारांच्या आग्रही भूमिकेमुळे तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कोकणाबाबत घेतलेल्या सहानुभूतीपूर्ण भूमिकेमुळे खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले –
प्राथमिक शाळेतील अतिरिक्त पदवीधर शिक्षकांचे समायोजन मंजूर पदांवरच करण्यात येईल. जिल्ह्याबाहेर एकाही शिक्षकाला समायोजनासाठी जावे लागणार नाही.
इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थी संख्येची अट 20 वरून 10 पर्यंत शिथील करण्यात आली.
उर्दू प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे समायोजन उर्दू शाळांमध्येच करण्यात येईल.
हे सर्व निर्णय चालू शैक्षणिक वर्षासाठी तातडीने अंमलात आणण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे कोकणातील शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.








