सैतवडे, दि. १ : दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या इतिहासात प्रथमच तब्बल ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला विशेष रंगत आणली.
स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत घेण्यात आली. प्राथमिक फेरीनंतर दोन्ही गटांतील प्रत्येकी नऊ असे एकूण १८ विद्यार्थी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे प्रभावी सादरीकरण करत आपल्या वक्तृत्वकौशल्याची छाप पाडली.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजनाची जबाबदारी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे सांभाळली. मुख्याध्यापिका सौ. देशमुख, शिक्षक पांडुरंग नाईक व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन सान्वी भिंगार्डे हिने केले, तर ईशांत सावंत याने आभार मानले. परीक्षण श्री. नाईक आणि श्री. पवार यांनी केले.
निकाल : लहान गटात समायरा पारेख प्रथम, हर्ष विभुते व अवनी जाधव संयुक्त द्वितीय, तर आराध्य जाधव तृतीय ठरली. मोठ्या गटात श्रमिका जाधव प्रथम, रागिनी जाधव व श्रुती सावंत संयुक्त द्वितीय, तर कस्तुरी बेंदरकर तृतीय आली.
मुख्याध्यापिका सौ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य विकसित होत असल्याचे सांगितले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.








