मुंबई, दि. ८ : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर राजधानी एक्स्प्रेससह तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आगामी गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंजुरी मिळालेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी–मंगळुरू एक्स्प्रेस (१२१३३/१२१३४), तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (१२४३१/१२४३२) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–कोचुवेली गरीब रथ एक्स्प्रेस (१२२०१/१२२०२) यांचा समावेश आहे.
कोरोना काळात राजधानी आणि गरीब रथ एक्स्प्रेसचे सावंतवाडीतील थांबे बंद करण्यात आले होते. ते पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सातत्याने पाठपुरावा करत होती. रेल्वे प्रवासी संघटनेचे विनोद नाईक-राणे यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून हा विषय मार्गी लावला.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग आणि दक्षिण कोकणातील प्रवाशांना दिल्ली, मुंबई आणि केरळकडे जाण्या-येण्यासाठी अधिक सोयीची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुलभ होणार असून पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.








