रत्नागिरी, दि. १७ : रत्नागिरी शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटनवृद्धी आणि पारदर्शक कारभार हे महायुतीचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन करत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत “रत्नागिरी नगर परिषदेवर महायुतीचाच भगवा फडकेल” असा विश्वास व्यक्त केला. निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना ते बोलत होते.
रत्नागिरीतील ३२ पैकी ६ जागांवर भाजपाचे, तर २६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. “शिल्पाताई शंभर टक्के रत्नागिरीच्या नगराध्यक्षा होतील. पारदर्शक कार्यक्रम, पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज यासाठीच त्यांची निवड करण्यात आली आहे,” असे सामंत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “एक वर्षाच्या आत नगराध्यक्ष आणि सर्व ३२ नगरसेवकांना आपल्या कामाचा ठोस परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. यात कोणालाही सवलत नाही. कारभार पारदर्शक, प्रामाणिक आणि विकासाभिमुख असलाच पाहिजे.”
पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे उपस्थित होते.
जनतेला अपेक्षित विकास महायुतीच देणार — शिल्पा सुर्वे
महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनीही महायुतीच्या सर्व ३२ उमेदवारांसह नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांच्या गर्दीत या नामनिर्देशनाची प्रक्रिया उत्साहात पार पडली.
नागरिकांना संबोधित करताना शिल्पा सुर्वे म्हणाल्या, “मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन महायुतीने माझ्यावर विश्वास ठेवला. रत्नागिरीकरांना अपेक्षित असलेला विकास नक्कीच घडवू. आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे भवितव्य उज्ज्वल बनवण्याची खात्री मी देते.”
“महायुतीचे सर्व ३२ नगरसेवक रत्नागिरीच्या जनतेसोबत ठामपणे उभे राहतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.








