मँचेस्टर, दि. ४ : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात शनिवारी एका नव्या पर्वाची नोंद झाली. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या १५ वर्षे ९९ दिवस वयात भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला असून, त्याने क्रिकेटचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा तब्बल ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. सचिन यांनी १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत १६ वर्षे २०५ दिवस वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक युवा खेळाडूंनी भारतीय संघात प्रवेश केला, मात्र सचिनचा हा विक्रम कोणीही मोडू शकले नव्हते. अखेर वैभव सूर्यवंशीने ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली.
वैभवची यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्या मालिकेत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतही पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत पदार्पणाची संधी दिली आणि वैभवने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले.
भारताकडून किशोरवयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये यापूर्वी पृथ्वी शॉचे नाव चर्चेत होते. पृथ्वीने २०१८ मध्ये १८ वर्षे ३२९ दिवस वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अपेक्षेप्रमाणे फुलू शकली नाही.
वैभव सूर्यवंशीने आता सचिनचा विक्रम मोडत भारतीय क्रिकेटमध्ये नव्या आशा निर्माण केल्या आहेत. इतक्या कमी वयात वरिष्ठ संघात स्थान मिळवणे हीच त्याच्या प्रतिभेची मोठी पावती मानली जात आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता असून, आगामी सामन्यांमध्ये तो आपल्या प्रतिभेची चमक दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सचिन तेंडुलकरनंतर पुन्हा एकदा एका किशोरवयीन खेळाडूने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचल्याने देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता वैभव सूर्यवंशी या ऐतिहासिक पदार्पणाचे मोठ्या कारकिर्दीत रूपांतर करतो का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.








