अमरावती, दि. २८ (प्रतिनिधी) : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी मेळघाट दौरा करून अंगणवाडी केंद्रे, पोषण पुनर्वसन केंद्र तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी बालकांचे पोषण, आरोग्य सेवा, अंगणवाड्यांतील सुविधा आणि महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या दौऱ्यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख, उपआयुक्त संगीता लोंढे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे उपस्थित होत्या.
मंत्री तटकरे यांनी भोकरबर्डी, धुळघाट रोड आणि कळमखार येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन तेथील सुविधा, बालकांचे पोषण आणि आरोग्य सेवांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी बालकांशी, त्यांच्या पालकांशी तसेच अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून सेवांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच स्थानिक आदिवासी महिला बचतगटाच्या सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
यानंतर त्यांनी धारणी येथील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन कुपोषित बालकांवरील उपचार व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि पोषण व्यवस्थेचा आढावा घेतला. उपचार घेत असलेल्या बालकांच्या मातांशी संवाद साधून त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि पोषणविषयक सेवांची माहिती घेतली.
दौऱ्याच्या शेवटी धारणी तहसील कार्यालयात महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत बालविवाह प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना राबविणे, बालकाच्या जन्मानंतरच्या पहिल्या एक हजार दिवसांतील पोषणाला प्राधान्य देणे, अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा, स्वच्छतागृहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करणे, गरोदर मातांना दर्जेदार आहार देण्याची व्यवस्था मजबूत करणे, अंगणवाडी इमारतींची कामे गतीने पूर्ण करणे तसेच महिला आणि बालकांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती ग्रामसभांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले.
मेळघाटातील बालकांचे पोषण, मातांचे आरोग्य आणि अंगणवाडी सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून या भागातील विकासकामांना गती देण्यात येईल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.







