सोबत आलात तरी ठीक, नाही आला तरी तुमच्याशिवाय! ; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा भाजपाला थेट इशारा

दापोलीत शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

दापोली, दि. २० (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना–भाजप युती जाहीर असली, तरी दापोली मतदारसंघात मात्र राजकीय चित्र वेगळे वळण घेताना दिसत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात भाजप, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच, कदम यांनी दापोलीत आक्रमक भूमिका घेत भाजपाला थेट इशारा दिला आहे.
“महायुती व्हावी ही माझीही इच्छा होती आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. शिवसेना–आरपीआय युती झाली आहे. मात्र मी गाफील राहणारा पुढारी नाही. माझी १०० टक्के तयारी झाली आहे. सोबत आलात तरी ठीक, नाही आला तरी तुमच्याशिवाय,” अशा ठाम शब्दांत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भाजपाचा समाचार घेतला.

मंगळवारी दापोली शहरात भव्य शक्तीप्रदर्शन करत शिवसेना व आरपीआयच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज दाखल केले. यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी उमेश राजे, सुधीर कालेकर, रोहिणी दळवी, राजन फणसे तसेच आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्रीतम रुके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत बोलताना कदम म्हणाले की, “हिंदुत्वाच्या नावाने मोर्चे काढणारे, रॅली करणारे काही घटक पक्ष आज ज्या पक्षाने हिंदुत्वाला विरोध केला, त्यांच्याच सोबत बैठका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे.” नाव न घेता त्यांनी भाजपावर टीका केली. २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “तेव्हा मी नवखा होतो, मतदारसंघात येऊन चार–पाच महिनेच झाले होते. आज नऊ वर्षांचा अनुभव आहे.”

खेड नगर परिषदेच्या अलीकडील निवडणुकीचा संदर्भ देत कदम म्हणाले, “विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी त्यांना एकही जागा मिळाली नाही. महायुतीने २१–० असा निकाल लावला. उबाठाला एकही जागा मिळाली नाही. तोच निकाल दापोलीतही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत लागेल.”

आपले हिंदुत्व कडवट असले तरी समाजात जातीय वा धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम आपण कधीही केले नाही, असे स्पष्ट करत कदम म्हणाले की, सर्व समाजघटक, धर्मबांधव आपल्या सोबत आहेत. मुस्लिम समाजालाही न्याय देत आपण त्यांना सोबत घेऊन चाललो आहोत.

“येणाऱ्या निवडणुकांत प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. कोणतीही चिंता करू नका. १८ पैकी १८ उमेदवार निवडून आल्याशिवाय हा योगेश कदम शांत बसणार नाही,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना जोश व बळ दिले.

आणखी वाचा