झी २४ तास वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील कॅमेरामन निलेश कदम यांचे निधन

रत्नागिरी, दि. ३१ (वृत्तसंस्था): झी २४ तास या वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट आणि शहरानजिकच्या शीळ गावचे रहिवासी निलेश कदम यांचे मुंबईतील सायन येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते ४५ वर्षांचे होते.

मागील १० वर्ष कॅमेरामनच्या भुमिकेत वावरणारे निलेश कदम मागील ५ वर्षे झी २४ तासचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून काम करीत होते. घरची शेती संभाळून त्यांनी पत्रकारितेमध्ये कॅमेरामन म्हणून आपला ठसा उमटवला. जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील अनेक घडामोडी त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या. दुरदर्शन, साम मराठी आणि झी २४ तास या ठिकाणी त्यांनी काम केले. चिपळूणच्या महापूरापासून ते जिल्ह्याात आलेल्या वादळांचे कव्हरेज त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मावळली. बुधवारी दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी शीळ येथे आणण्यात आले. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि लहान मुलगा असे कुटुंब आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच रत्नागिरीकरांनी हळहळ व्यक्त केली.

दैनिक सामना रत्नागिरीचे प्रतिनिधी दुर्गेश आखाडे यांची भावनिक पोस्ट..
‘माज’ गेला…हक्काचा माणूस गमावला! ‘माज’ अर्थात नीलेश कदम.माझा जिवलग मित्र.
माझ्यामुळेच तो मीडिया मध्ये आला.२००८ साली आमची ओळख झाली ती सचिन झगडेच्या स्टुडिओत.
तिथून आमची गट्टी जमली.
मी मराठी चॅनेलसाठी मी जेव्हा काम करत होतो तेव्हा त्याने मला खूप मदत केली.
मी मराठीसाठी कॅमेरामन म्हणून त्याने सुरूवात केली. कॅमेरामन व्हायची त्याची खूप इच्छा होती. म्हणून त्याने आधीच एक कॅमेरा विकत घेतला होता. सुरूवातीला तो लग्न किंवा अन्य कार्यक्रमाच्या ऑर्डर मारायचा. तिथून तो सुरूवातीला मी मराठी नंतर दूरदर्शन, साम टिव्ही आणि नंतर झी २४ तास चॅनेलसाठी काम करत होता. सुरूवातीला उमेदीच्या काळात त्याने रिक्षाही चालवली होती. घरची शेतीवाडी असूनही त्याला मीडियाची आवड होती.
माज हे नाव त्याला मीच दिलं होतं. भंडारी भाषेत त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळेच मी त्याला ‘माज’ हे नाव दिलं.
माज नावाने गावात,रत्नागिरीतही लोकं त्याला ओळखू लागले.त्याची आईही आमच्याशी बोलताना त्याला माज म्हणायची.
इतका माज सर्वांचा झाला होता. माज हे नाव त्यालाही आवडत होतं.
पण माज तू अखेर आम्हाला सोडून गेलास.
आज ते जुने दिवस डोळ्यासमोर उभे रहाताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. आपण केलेलं रिपोर्टिॅग, गणपतीपुळ्यात रवी राजवाडकरांकडच्या आठवणी,जालनाला जाताना तू घेतलेला पुढाकार, जम्मूच्या दौऱ्यात तू माझा रूम पार्टनर होतास.
तुझ्या घरचं चुलीवरचं जेवण. सर्व काही आज आठवतयं. कोणतेही काम सांगितलं की तू धावत यायचास.
आता तू नाहीस हे मनाला पटवणं खूप कठीण झालयं.
माज तुला…. भावपूर्ण श्रध्दांजली!

आणखी वाचा