रत्नागिरी जिल्हा परिषदेतील सुमारे ३५ कंत्राटी कर्मचारी सात महिन्यांपासून वेतनाविना

रत्नागिरी, दि. २३ : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील पाणी व स्वच्छता मिशन कक्षात कार्यरत असलेल्या सुमारे ३५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सात महिन्यांपासून पगार न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, शासनाने तातडीने थकीत वेतन अदा करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत हे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सातत्याने काम करूनही वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

वेतन न मिळाल्यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, बँकेचे कर्जहप्ते, वैद्यकीय खर्च आणि इतर दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. आर्थिक विवंचनेमुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताणही वाढला असून, नियमित कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून सात महिन्यांचे थकीत वेतन अदा करावे, तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांसह विविध स्तरांतून करण्यात येत आहे.

आणखी वाचा