रत्नागिरी, दि. २७ : जिल्हा परिषदेचे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे ३३ कोटी ६१ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे मूळ अंदाजपत्रक आज विशेष सभेत सादर करण्यात आले. महसूल, भांडवली तरतूद आणि वित्तप्रेषणाचा समावेश असलेल्या या अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी अंदाजपत्रक सादर करताना ग्रामीण विकास आणि लोककल्याणकारी योजनांवर विशेष भर दिला असल्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे तसेच महिला व बालकल्याण सभापती मयुरी शिर्के उपस्थित होते.
अंदाजपत्रकात ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २ कोटी २३ लाख ८५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल सामान्य प्रशासनासाठी २ कोटी १९ लाख आणि समाजकल्याण विभागासाठी २ कोटी ११ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागासाठी १ कोटी ५ लाख तर दिव्यांग कल्याणासाठी ८५ लाख ६१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण विभागासाठी ९५ लाख, आरोग्य विभागासाठी ७० लाख आणि कृषी विभागासाठी ८० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि शेती विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय ऊर्जा विकास, निवृत्ती वेतन, पशुसंवर्धन आणि वन विभागासाठीही आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. संकीर्ण खर्चासाठी तब्बल ४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पीय सभेला जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, संतोष थेराडे, बाबू म्हाप, प्रमोद अधटराव, नेहा माने, पूजा निकम, नेहा ठाकूर, सुशील भायजे, माधवी गिते यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








