चिपळूण, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेर्डी (देऊळवाडी) येथे श्री ग्रामदेव सुखाई देवस्थान मंदिरात झालेल्या बैठकीत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.
या संघाच्या स्थापनेवेळी सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक, तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेच्या प्रगतीसाठी व गुणवत्तावृद्धीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वसंमतीने खालीलप्रमाणे करण्यात आली – अध्यक्ष: श्री. अनिल एकनाथ फाळके उपाध्यक्ष: श्री. महेश गोविंद गुरव कोषाध्यक्ष: श्री. मिलिंद भागुराम मोहिते सचिव: सौ. प्रिया खेडेकर (मुख्याध्यापिका) व कदम मॅडम सल्लागार: श्री. अशोक भिकाजी गुरव सदस्य: देऊळवाडी कोंडातील माजी विद्यार्थी व ग्रामस्थ
या कार्यक्रमाला देऊळवाडी
कोंडातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, तरुण मंडळी तसेच शाळेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या विकासात माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग मिळाल्याने
शिक्षणाची गुणवत्ता आणि शाळेचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच हातभार लागेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमात करण्यात
आले. शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता त्यांनी आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी पुन्हा एकत्र येत समाजात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
खेर्डी (देऊळवाडी) जिल्हा परिषद शाळेचा हा माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा उपक्रम ग्रामीण भागात शैक्षणिक विकासासाठी आदर्श ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.