पोलादपूर, दि. ०२ (शैलेश पालकर): तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहिर झाल्यानंतर 18 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, उर्वरित चार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर 2023मध्ये संपुष्टात येणार असल्याने निवडणुकप्रक्रिया पूर्ण होऊनही उपसरपंचपदाची निवडणूक येत्या 8 आणि 12 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर शुक्रवार, दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांची निवडणूक पार पडली. तालुक्यातील देवळे, बोरावळे, सवाद आणि माटवण या चार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ अद्याप संपुष्टात आला नसल्याने तेथील निवडून आलेले सरपंच अद्याप कार्यभार स्विकारू शकले नाहीत तसेच तेथील उपसरपंचपदाची निवडणूक 8 आणि 12 डिसेंबर 2023 ला होणार असल्याची माहिती तहसिलदार कपिल घोरपडे यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यातील धारवली ग्रामपंचायतीच्या प्रल्हाद शांताराम चाचले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. कापडे बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र सकपाळ हे बिनविरोध निवडून आले आहेत. सडवली ग्रामपंचायत उपसरपंच पदी संतोष जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. मोरसडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी दिपक सालेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पांगळोलीमध्ये सरपंच पद रिक्त राहिले असून उपसरपंचपदी नंदकुमार जाधव यांची निवड झाली आहे. कोंढवी ग्रामपंचायत उपसरपंचपदी अमोल शिंदे यांची निवड झाली आहे. महालगूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र मोरे यांची निवड झाली आहे. काटेतळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली आहे. देवपूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुरेश शिंदे यांची निवड झाली आहे. मोरगिरी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी शेकापक्षाचे प्रमोददादा शिंदे बिनविरोध निवडून आले आहेत. पळचिल ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवृत्ती जाधव यांची निवड झाली आहे. गोवेले ग्रामपंचायतीत रमेश मोरे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. आडावळे बुद्रुक राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडी उपसरपंचपदी सविता मालुसरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. चरई ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे संदेश कासार यांची निवड झाली असून उपसरपंचपदी शनिवारी होऊन सतीश देवजी बांदल यांची उपसरपंचपदी निवड झाली. पोलादपूर तालुक्यातील बोरज, साखर या ग्रामपंचायतीमध्ये सुलोचना मुकणे या आदिवासी महिलेला सरपंच पदाची संधी मिळाली असून उपसरपंच पदी शिवाजी मालुसरे यांची निवड झाली. कुडपण बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये अजय चिकणे यांची सरपंच पदी निवड झाली असून उपसरपंच पदी अविनाश चिकणे यांची निवड करण्यात आली आहे. वाकण ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे शांताराम जंगम तर उपसरपंचपदी नारायण जगताप यांची निवड झाली आहे. महाळुंगे ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या विकास नलावडे तर उपसरपंचपदी सुखदेव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
देवळे ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या सुनिता मेस्त्री निवडून आल्या आहेत. माटवण ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या बाया वाघे निवडून आल्या आहेत. बोरावळे ग्रामपंचायत शेकापक्षाकडे गेल्या अनेक वर्षांपासून असून या निवडणुकीतही लालबावटा फडकविण्यात यश मिळाले आहे. संचिता वैभव चांदे या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. सवाद ग्रामपंचायत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात आली असून शर्मिला उतेकर यांची सरपंच पदी निवड झाली आहे. या चारही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर 2023 मध्ये संपुष्टात येत असल्याने हे चार सरपंच अनुक्रमे 8 आणि 12 डिसेंबररोजी कार्यभार स्विकारतील तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक त्याच दिवशी केली जाणार आहे. कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याप्रमाणेच तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातही निरिक्षकपदी श्रेणी दोनचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तहसिलदार कपिल घोरपडे यांनी दिली.








