मतदार नोंदणीकरिता शनिवारी, रविवारी विशेष शिबिरे

रत्नागिरी, दि. २४ (जिमाका): 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधित नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती व वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी शनिवार 25 नोव्हेंबर व रविवार 26 नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशी  जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.

या शिबिरांमध्ये मतदान केंद्रावर सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे या दोनदिवशी उपस्थित राहून नागरिकांचे मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीचे अर्ज भरुन घेणार आहेत. तरी या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.

तृतीय पंथीय / महिला सेक्स वर्कर / भटक्या विमुक्त जमाती साठी 2 व 3 डिसेंबर 2023 विशेष   शिबिरे या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तृतीय पंथीय / महिला सेक्स वर्कर/भटक्या विमुक्त जमातीमधील अधिकाधिक वंचित नागरिकांची मतदार यादीमध्ये नोंदणी होण्यासाठी विशेष शिबिरे 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी तहसील स्थरावर आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी अशा घटकातील व्यक्तीसांठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्था यांनी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालयांमध्ये संपर्क साधून या शिबिरांसाठी प्रशासनास सहकार्य करावे.

तरी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वरील विशेष शिबिरांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मतदारयादीच्या शुध्दीकरणासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सन 2024 मध्ये येवू घातलेल्या निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्वाची संधी असल्याने पात्र नव मतदारांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी असे आवाहनही केले आहे.

आणखी वाचा