जंतर-मंतरवर शरद पवारांची अभिजीत दिपकेंची भेट; जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस, आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा

नवी दिल्ली, दि. २१ : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतर-मंतरवर जाऊन कॉक्रोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

शरद पवार यांनी आंदोलनाची भूमिका, जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत अभिजीत दिपके यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहितीही त्यांनी घेतली.

यावेळी अभिजीत दिपके यांनी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करावी, आंदोलनादरम्यान देशभरातील विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर, विशेषतः विद्यार्थिनींवर बळाचा वापर केल्याचा आरोप केला. “विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, त्यांच्याशी गैरवर्तन झाले,” असा आरोपही त्यांनी केला. तसेच, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी सुरुवातीपासूनच आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सातत्याने साथ दिल्याचे सांगितले.

दिपके यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांनी आंदोलनाची सविस्तर माहिती घेतली आणि “आणखी काही मदत हवी का?” तसेच “आंदोलन किती दिवस सुरू ठेवणार?” अशी विचारणा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावरून राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापले असून, जंतर-मंतरवरील आंदोलनाला विविध विरोधी पक्षांचा पाठिंबा वाढत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा