कुटगिरीतील लोखंडी पूल कोसळला; गुरे अडकली, एका बैलाचा मृत्यू

गुहागर, दि. ३ (प्रतिनिधी): तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असताना त्यावरून जात असलेली गुरे पुलाखाली अडकली असून, दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित जनावरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जनावरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि पुलाची जड लोखंडी संरचना जनावरांवर कोसळल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. काही ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून नदीत उतरून जनावरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लोखंडी गार्डर हटविल्याशिवाय अडकलेल्या जनावरांची सुटका शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. बचावकार्यासाठी जेसीबीसह आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी पाठविण्यात येत असून अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, हा लोखंडी पूल सुमारे ३० ते ३२ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. नुकतेच पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि नवीन पुलाचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र त्याआधीच पूल कोसळल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाच्या कोसळण्याचे नेमके कारण शोधून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी वाचा