भाजपच्या ३० वर्षांच्या बालेकिल्ल्याला प्रशांत किशोरांचा सुरुंग; बांकीपूर पोटनिवडणुकीत दणदणीत विजय, राष्ट्रीय राजकारणात नवी समीकरणे

पाटणा/नवी दिल्ली, दि. ३ : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १८,९५३ मतांनी पराभव करत प्रशांत किशोर यांनी तब्बल ३० वर्षांपासून अभेद्य राहिलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यावर कब्जा केला. त्यामुळे या निकालाकडे केवळ एका पोटनिवडणुकीचा निकाल म्हणून नव्हे, तर बिहारच्या राजकारणातील मोठा राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे.

बांकीपूर हा भाजपचा पारंपरिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जातो. १९९५ पासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व कायम होते. प्रथम नबीन किशोर सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नवीन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ अशा सलग चार विधानसभा निवडणुकांत नितीन नवीन विजयी झाले होते. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली.

विशेष म्हणजे, नितीन नवीन यांची अलीकडेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याने ही निवडणूक त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेशी जोडली गेली होती. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात भाजपला झालेला पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मतमोजणीत सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर यांनी आघाडी कायम ठेवली. अखेरीस त्यांना ६३,२०३ मते मिळाली, तर भाजपचे नीरज कुमार सिन्हा ४४,२५० मतांवर थांबले. राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, “हा विजय केवळ माझा किंवा जनसुराज पक्षाचा नाही, तर बांकीपूरच्या जनतेचा आहे. ही निवडणूक फक्त आमदार निवडण्यासाठी नव्हती. बिहारला सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व मिळावे, हा संदेश जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे.” राज्यातील शिक्षण, रोजगार आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व मिळण्याची गरज त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार मानतानाच, ज्यांनी मतदान केले नाही त्यांचाही विश्वास संपादन करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजकीय रणनीतीकार म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेल्या प्रशांत किशोर यांनी काही महिन्यांपूर्वी जनसुराज पक्षाची स्थापना करून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. पहिल्याच मोठ्या निवडणुकीत भाजपच्या मजबूत गडात विजय मिळवल्यामुळे त्यांचा बिहारच्या राजकारणातील प्रभाव वाढल्याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल जनसुराज पक्षासाठी मोठे राजकीय बळ देणारा ठरू शकतो.

दरम्यान, इतर दोन पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर झाले. मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा ६,०१६ मतांनी पराभव केला. तर गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघात भाजपचे सतेंद्रभाई पटेल यांनी काँग्रेसचे भिखाभाई रबारी यांचा ३०,६३० मतांनी पराभव करत भाजपचा गड कायम राखला.

मात्र, या तिन्ही निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो बांकीपूरचा निकाल. कारण या निकालामुळे बिहारच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणात प्रशांत किशोर हे भाजप, जदयू, राजद आणि काँग्रेससमोर एक प्रभावी पर्याय म्हणून उभे राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा