रत्नागिरीत २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

६२ उद्योग घटकांशी सामंजस्य करार; २,४२६ रोजगारांची निर्मिती; फाईव्ह स्टार हॉटेलसह जहाजबांधणी, सेमीकंडक्टर उद्योगांना चालना

रत्नागिरी, दि. ३० : कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना समज दूर करत रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळाली आहे. जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६ मध्ये जिल्ह्यातील तब्बल ६२ उद्योग घटकांशी २,१५९.३७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. या गुंतवणुकीतून सुमारे २,४२६ रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याने रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र आहे. पर्यटन, जहाजबांधणी, सौर ऊर्जा, मत्स्य व्यवसाय आणि रसायन उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे.

फाईव्ह स्टार हॉटेलसाठी १०० कोटींची गुंतवणूक

रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा म्हणजे हॉटेल एक्सप्रेस इनकडून १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर, शहरापासून तीन किलोमीटर आणि समुद्रापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर एमआयडीसीच्या जागेत हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

याशिवाय जयगड येथे आनंद महिंद्रा यांच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या पंचतारांकित हॉटेलचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, हे हॉटेल लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होणार असल्याची माहिती परिषदेत देण्यात आली.

रत्नागिरी विमानतळाचेही सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एटीआर प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. विमानसेवा सुरू झाल्यास पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

जहाजबांधणी प्रकल्पात १,४१३ कोटींची गुंतवणूक

जिल्ह्यातील प्रमुख गुंतवणुकीमध्ये SQUARE Port Shipyard Private Limited या कंपनीच्या जहाजबांधणी उद्योगासाठी तब्बल १,४१३ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. याशिवाय Hotel Express Inn १०० कोटी, Solar Scape LLP ३५ कोटी, Deluxe Fisheries १० कोटी आणि RA Specialty Chemical १५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

या गुंतवणुकीमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक व्यवसाय, सेवा आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

स्टील उद्योगातून १० ते १२ हजार रोजगारांची अपेक्षा

जिल्ह्यात स्टील उद्योग उभारणीचा मार्ग मोकळा होत असून, या उद्योगातून किमान १० ते १२ हजार स्थानिकांना रोजगार मिळण्याची शक्यता डॉ. सामंत यांनी व्यक्त केली. तसेच ‘व्हीआयटी’कडील जमीन ‘आरआरपी’ या सेमीकंडक्टर कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे प्रदूषणमुक्त एमआयडीसी उभारण्यासही गती देण्यात येत आहे. या एमआयडीसींमधून पर्यावरणाचा समतोल राखत उद्योगांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

‘मिलाप’ ॲपद्वारे उद्योगांसाठी सुलभ प्रक्रिया

उद्योजकांना एमआयडीसीची जागा मिळविण्यासाठी ‘मिलाप’ ॲप सुरू करण्यात आले आहे. वैध अर्ज केल्यानंतर पुढील सोमवारी घरबसल्या थेट ऑफर लेटर मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘मैत्री’ पोर्टलवर अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विलंब झाल्यास प्रकरण आयुक्तांकडे जाऊन पुढील आठ दिवसांत मंजुरी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना’

डॉ. उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढला असून, त्यामध्ये स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेऊन २,१५९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प पूर्ण करू.”

तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग व स्टार्टअप उभारावेत. नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बना, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत १,८३७ गुंतवणूक करारांद्वारे ८२,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्यातून १,५५,३८९ रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.

परिषदेला उद्योग विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी मीनाक्षी कुंभार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर, एमआयडीसी फेडरेशनचे प्रशांत पटवर्धन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक राजेश सावंत, राज आंब्रे यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर यांनी आभार मानले.

आणखी वाचा