कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात वाहनांवर गळती सुरूच

'आयआयटी'नुसार उपाययोजना करण्याच्या बाता निष्फळच! 'बाप्पाच्या कृपेवरच' गणेशभक्त चाकरमान्यांचा निर्विघ्न प्रवास अवलंबून

पोलादपूर, दि. २९ (शैलेश पालकर): मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला भुयारी मार्गामध्ये वाहनांवर पाण्याची गळती अद्याप सुरू आहे. भुयाराचे काम पूर्ण झाल्यावर गेल्या पाच वर्षापासून छताच्या बाजूच्या कातळातून ही पाण्याची गळती रोखण्यासाठी आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार उपायोजना करण्याच्या बाता निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्याही गणेशोत्सवातील दोन्ही भुयारी मार्गांतील वाहतूक बाप्पाच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडण्याच्या प्रार्थनेखेरीज पर्याय दिसून येत नाही.
कशेडी घाटातील ६ लेन असलेल्या दुहेरी भुयारी मार्ग आणि जोडरस्त्यांच्या एकूण बांधकामासाठी सुमारे ५०२ कोटी खर्च मंजूरी निश्चित करण्यात आली होती. रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्टने या कामाचे टेंडर मिळवून शिंदे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेड (एसडीपीएल) या पोटठेकेदार कंपनीमार्फत भुयारी मार्गाचे खोदकाम २०१९ मध्ये सुरू केले. दोन्ही भुयारी मार्गाची प्रत्येकी रुंदी १४ मीटर व उंची ८ मीटर आहे. दोन्ही बाजूंना एकूण ७ किलोमीटर लांबीचे जोडरस्ते असल्याने संपूर्ण प्रकल्पाची लांबी ९ कि.मी. आहे. यातील भुयारी मार्ग प्रत्येकी २ कि.मी. लांबीचा आहे. या भुयारी मार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण झाल्यावर भुयारात काही अंतरावर छताकडील कातळातून भुगर्भातील पाण्याची भुयारी मार्गात वाहनांवर गळती सुरू झाली असल्याने छताकडील कातळामध्ये भुगर्भातील पाण्याचा मोठा साठा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
यावर आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार उपायोजना करण्याच्या चर्चा पोटठेकेदारांकडून करण्यात येऊन मलमपट्टी करण्यास सुरुवात केली.बारमाही भुयारी मार्गात गळती सुरू असताना पावसाळ्यात गळतीचे प्रमाण अधिक असते. भुयाराच्या छतावरून आणि भिंतींवरून पाण्याचे मोठे फवारे उडत असल्याचे गेल्या वर्षीपर्यंत पाहायला मिळाले. यामुळे भुयाराच्या आतील रस्ता निसरडा झाल्याने अपघाताचा धोका वाढला. पाण्याचा निचरा योग्य रीतीने झाला नाही व गळती रोखण्यासाठी केलेले कोटिंगचे काम टिकू शकले नाही. ड्रेनेज आणि पन्हाळी भुयारी मार्गाच्या छतातून गळणारे पाणी थेट रस्त्यावर किंवा वाहनांवर पडू नये म्हणून विशिष्ट पन्हाळी लावून ते पाणी मुख्य ड्रेनेज लाईनद्वारे भुयाराबाहेर काढण्यात आले.
मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गळती रोखण्यासाठी करण्यात आलेले सर्व उपाय निष्फळ ठरले असून, दोन्ही भुयारी मार्गांमधील गळती सद्यस्थितीतही सुरूच आहे. आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार किंवा मार्गदर्शनाखाली अंतर्गत भागातील खडकाचा दाब आणि पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी शॉटक्रिटसह पीव्हीसी मेम्ब्रेन आणि फायबर शीटचे अस्तर बसवण्यात आले. यामुळे भुयारी मार्गातील तीन पदरी रस्त्याच्या दूतर्फा बांधलेल्या गटारांमध्ये छताच्या खडकातील गळणारे पाणी वळविण्यात आले आहे. तरीदेखील दोन्ही भुयारातील रस्ते निसरडे होऊन अपघात होऊ शकेल इतपत धोका अद्याप कायम आहे. गळणाऱ्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालकांना गाड्या चालवताना वाहनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना दोन्ही भुयारांमधील गळतीमुळे वाहने घसरण्याच्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे.
तब्बल ५१२ कोटी खर्चाच्या या भुयारी मार्गातील छताकडील कातळातून भुगर्भातील पाण्याची गळती सुरू असल्याने त्यावरील उपाययोजना करण्यासाठी गळती दुरुस्तीचा खर्च किंवा गळती रोखण्याचे हे काम प्रकल्पाच्या ‘दोष दायित्व’ कालावधी अंतर्गत असल्यामुळे कंत्राटदार कंपनीवरच या मोफत दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या दुरुस्तीसाठी स्वतंत्र किंवा वेगळा अतिरिक्त खर्च घोषित केलेला नाही. त्यामुळे गळती बंद करण्याचा खर्च मूळ कंत्राट आणि मेंटेनन्स कराराचाच भाग ठरला आहे.
सद्यस्थितीत कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी आधुनिक व्हेन्टीलेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून हाय-टेक एलईडी पथदीप आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ११ केव्ही वीज पुरवठ्यासह जनरेटर बॅकअप देखील ठेवण्यात आले आहे. दोन्ही भुयारी मार्गाला अंतर्गत जोडणारे आपत्कालीन रस्ते आहेत. मात्र,गळतीची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणि योग्य तांत्रिक तोडगा काढण्यासाठी ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांची मदत घेऊन दोन्ही भुयारी मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येऊनही गळती सुरुच राहिल्याने आगामी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या व कोकणातून येणाऱ्या वाहनांना निसरड्या रस्त्याच्या धोक्यालाही सामोरे जावे लागेल,हे निश्चित आहे. याखेरीज, दोन्ही भुयारी मार्गाच्या जोड रस्त्यावर बाजुच्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे आणि दरडी कोसळण्याच्या धोकाही गेल्या वर्षभरात वाढला आहे.
मात्र, याबाबत ‘एसडीपीएल’चे अमोल शिवतारे यांनी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करीत लवकरच दोन्ही भुयारी मार्ग गळती मुक्त करण्याची ग्वाही प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिली. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी आणि अमोल माडकर यांनी ‘एसडीपीएल’चे अमोल शिवतारे यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला. परिणामी, कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातील यंदाच्या गणेशोत्सवातील वाहतूक ‘गणपतीबाप्पा’ निर्विघ्नपणे पार पाडेल, एवढीच प्रार्थना करणे चाकरमानी आणि गणेशभक्तांच्या हाती आहे.

आणखी वाचा