मुंबई, दि. ३० : गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण मोठ्या प्रमाणात संपल्याने आता एसटी आणि खासगी बसवर प्रवाशांचा भर आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या हंगामात खासगी बसच्या तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. काही मार्गांवर प्रवाशांना चार ते पाच हजार रुपये भाडे मोजावे लागत आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून सुमारे १२ ते १३ लाख नागरिक कोकणात जातात. या काळात सुमारे तीन ते साडेतीन हजार खासगी बसेस धावतात. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन खासगी बसच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
नियमांनुसार गणेशोत्सवाच्या हंगामात एसटीच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारण्याची खासगी ट्रॅव्हल्स बसला परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्षात नियमित काळात सुमारे एक हजार रुपये असलेले काही मार्गांचे तिकीट आता चार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
१ लाख १३ हजार प्रवाशांचे रेल्वे आरक्षण
नोकरदार आणि चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. यंदा मुंबईहून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १३ हजार ४२८ प्रवाशांनी आरक्षण केले असून, रेल्वेला त्यातून ७.७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मध्य रेल्वेकडून २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरदरम्यान २०० विशेष आरक्षित आणि ६२ अनारक्षित फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेकडूनही ७ ते २६ सप्टेंबरदरम्यान ५४ आरक्षित विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
एसटीच्या ५२०० गणपती स्पेशल गाड्या
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ५२०० गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६१२ एसटी बसेसचे आरक्षण पूर्ण झाले असून, त्यातील ३८७ गाड्या समूह आरक्षणाच्या आहेत. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने ११ व १२ सप्टेंबरच्या गाड्यांना मोठी मागणी आहे.
१२ सप्टेंबरचे खासगी बसचे भाडे
| मार्ग | अंदाजे भाडे |
|---|---|
| मुंबई–सिंधुदुर्ग | ४ हजार रुपये |
| मुंबई–कुडाळ | ३ ते ३.५ हजार रुपये |
| मुंबई–कणकवली | ३ ते ४ हजार रुपये |
| मुंबई–सावंतवाडी | ४ ते ४.५ हजार रुपये |
मुंबई बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक यांच्या म्हणण्यानुसार, सध्या दररोज सुमारे १३० खासगी बसेस कोकणात जात असून गणेशोत्सव काळात ही संख्या सुमारे ३५० पर्यंत वाढणार आहे. एसटीच्या दीडपट भाडेवाढीनुसार खासगी बस भाडे आकारण्यास परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वेचे आरक्षण मिळाले नाही तर प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांकडून एसटीच्या समूह आरक्षणाचा पर्याय स्वीकारला जात आहे. “एसटीची माणशी ३०० रुपयांप्रमाणे तिघांची ९०० रुपयांची तिकिटे काढली आहेत,” अशी माहिती कल्याणचे प्रवासी विठोबा नार्वेकर यांनी दिली.








