रत्नागिरी, दि. ३० : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि पारंपरिक खेळांचे जतन करण्याबरोबरच महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांची विशेष उपस्थिती या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार असून, महिला वर्गामध्ये कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (राणादा), अक्षया देवधर, ‘बाणू’ या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा केसकर, प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत तसेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम गिरिजा प्रभू यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे महिलांना आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे.
भाजप महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मंगळागौर सोहळ्यात पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
मंगळागौर हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि महिला शक्तीच्या एकतेचा उत्सव आहे. आधुनिकतेच्या युगातही पारंपरिक खेळ, लोककला आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. महिलांना एकत्र येऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मंगळागौर हे प्रभावी व्यासपीठ ठरते, असे वर्षाताई ढेकणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित महिलांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध महिला कल्याणकारी योजनांची माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम व्हावे, यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश आहे. मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमुळे जुन्या संस्कृतीची आठवण जागी होणार असून, नव्या पिढीलाही या परंपरांची ओळख होणार आहे.
रत्नागिरीतील सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य मंगळागौर सोहळ्याचा आनंद घ्यावा, पारंपरिक संस्कृतीचा उत्सव साजरा करावा आणि मराठी मनोरंजन विश्वातील आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी साधावी, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांनी केले आहे.








