रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले; मराठी, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

रत्नागिरी, दि. २९ : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेषतः मराठी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना पुस्तकांअभावी वर्गात बसावे लागत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर यांसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून पाठ्यपुस्तके उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत.

राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आल्याने नव्या पाठ्यपुस्तकांची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही काही वर्गांतील आणि विशेषतः उर्दू माध्यमातील पुस्तकांचा तुटवडा कायम असल्याचे चित्र आहे.

एकीकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात शंभर टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या दाव्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उर्दू माध्यमातील तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना काही विषयांची पुस्तके अद्याप उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही पुस्तकांच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. पुस्तकांशिवाय अध्यापन करावे लागत असल्याने शिक्षकांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना धड्यांचा नियमित अभ्यास करता येत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मागणी करूनही पुस्तकांचा तुटवडा

शाळांच्या पटसंख्येनुसार आवश्यक पाठ्यपुस्तकांची मागणी संबंधित यंत्रणेकडे नोंदविण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मागणीच्या तुलनेत कमी पुस्तक संच प्राप्त झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकांपासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती आहे. शैक्षणिक वर्षाचा महत्त्वाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही हा प्रश्न कायम असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मग पुस्तके गेली कुठे?

जिल्ह्यात शंभर टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले असल्याचा शिक्षण विभागाचा दावा असेल, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना पुस्तके का मिळाली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागणीच्या तुलनेत किती पुस्तके प्राप्त झाली, किती शाळांना वितरित झाली आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत किती पुस्तके पोहोचली, याची तपासणी होणे गरजेचे आहे.

विशेषतः उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या समस्येची तातडीने दखल घेऊन पुस्तकांच्या उपलब्धतेबाबत तालुकानिहाय आढावा घ्यावा, अशी मागणी पालक आणि शिक्षकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उर्वरित पाठ्यपुस्तके तातडीने उपलब्ध करून देऊन त्यांचे वितरण करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक वर्षाचे तीन महिने उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेच्या अंमलबजावणीचा नेमका फायदा कोणाला होत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आणखी वाचा