मुंबई, ३१ ऑगस्ट : महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान सुमारे दोन कोटी सात लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा सुरू असताना, या मतदारांना कायमचे मतदार यादीबाहेर केलेले नाही, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली यादी ही केवळ मसुदा असून, अंतिम मतदार यादीपूर्वी दावे व हरकती नोंदविण्याची संपूर्ण प्रक्रिया उपलब्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
चोकलिंगम यांनी प्रत्येक मतदाराला स्वतःचे नाव मसुदा मतदार यादीत आहे की नाही, तसेच नाव आणि इतर तपशील अचूक आहेत की नाही, याची पडताळणी करण्याचे आवाहन केले. नाव आढळले नाही किंवा तपशिलात काही चूक असल्यास संबंधित अर्ज करून नावाचा समावेश अथवा दुरुस्ती करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
दोन कोटी सात लाख मतदारांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ७५.५२ लाख मतदार अनुपस्थित राहिले किंवा संपर्कात आले नाहीत, ७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत, ३४.८१ लाख मतदार मृत असल्याचे आढळले, १७.६३ लाख मतदार अन्यत्र नोंदणीकृत किंवा दुबार नोंद असलेले आहेत, तर २.२३ लाख मतदार इतर श्रेणीत आहेत.
या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मतदार भेटला नाही तर पुन्हा भेट देण्याची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, काही पात्र मतदार चुकीच्या श्रेणीत गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.
विशेषतः शहरी भागात अनेक नागरिक दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्याशी संपर्क साधताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सध्याची यादी अंतिम नसून नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपले नाव तपासणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर मसुदा मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जात असून, राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनाही या याद्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पात्र मतदारांचे नाव वगळले गेले असल्यास आवश्यक अर्जाद्वारे पुन्हा समावेश करता येणार आहे.
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले’ असा गैरसमज करून घेऊ नये. मसुदा यादी तपासा, त्रुटी आढळल्यास दुरुस्ती करून घ्या आणि आपल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.








