चिपळूण, दि. २८ : रक्षाबंधनाचे औचित्य साधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी व युवती सेनेच्या वतीने चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी चिपळूण शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालून तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून वाचवावे, अशी मागणी करण्यात आली.
यानंतर पदाधिकाऱ्यांनी चिपळूण पोलीस उपविभागीय कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेऊन अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराबाबत चर्चा केली. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे, विक्रीचे जाळे चालविणारे आणि त्यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील शाळा-महाविद्यालय परिसर, तरुणांची वर्दळ असलेली ठिकाणे, संवेदनशील भाग तसेच निर्जन ठिकाणी पोलिसांची गस्त आणि देखरेख वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. अंमली पदार्थांचा प्रसार हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तरुणांचे भविष्य आणि सामाजिक सुरक्षिततेशी निगडित गंभीर विषय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराचे संपूर्ण जाळे आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
“ही राखी केवळ सणाची परंपरा नसून विश्वास, संरक्षण आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. चिपळूणच्या तरुणाईला नशेपासून वाचविण्यासाठी पोलिसांची निर्णायक कारवाई हीच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाची ओवाळणी असेल,” अशी भावना महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी महिला आघाडी शहर संघटक वैशाली शिंदे, निशा बोभस्कर, तीर्था लाड, नगरसेविका वैशाली कदम, सुप्रिया वंजारे, फिरदोस कवारे, मानसी चाळके, सेजल कदम, दामिनी दळी आदी उपस्थित होते.








