दापोली तालुक्यात निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटनाची विविध आकर्षणे आहेत. त्यामुळे वर्षभर पर्यटकांची येथे ये-जा सुरू असते. मात्र, दापोलीत आल्यानंतर विविध पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांना स्वतःच्या वाहनांवर किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. अनेकदा वाहतुकीच्या मर्यादित सुविधांमुळे पर्यटकांची गैरसोय होते. ही अडचण दूर करण्यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी उपलब्ध करून देणारी ‘रेंट-अ-बाईक’ योजना सुरू करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेमुळे पर्यटकांना आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार दापोलीतील विविध पर्यटनस्थळांना भेट देता येईल. तसेच स्थानिक तरुणांना दुचाकी भाड्याने देण्याच्या व्यवसायातून स्वयंरोजगाराची संधी मिळू शकेल. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनाही याचा फायदा होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाने या मागणीचा सकारात्मक विचार करून योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक परवानग्या, नियम आणि अटी निश्चित कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग, भगवान घाडगे, शहर पालक राजेंद्र पेटकर, नगरसेविका प्रीती शिर्के, मंदार केळकर, नदीम मुकादम आणि स्वरूप महाजन आदी उपस्थित होते.
दापोलीचे पर्यटन अधिक पर्यटकस्नेही बनविण्यासाठी अशा सुविधांची आवश्यकता असून, या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास पर्यटन विकासासह स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग खुला होऊ शकतो. आता या निवेदनावर शासन कोणती भूमिका घेते, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे.








