गोळप कट्टा I रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आणि कोकणातील पहिले कृत्रिम गर्भधारणा केंद्र रत्नागिरीत सुरु करणाऱ्या : डॉ. तोरल शिंदे

डॉ. तोरल शिंदे

मुलाखतीतून आपला प्रवास सांगताना….
माझा जन्म मुंबई येथील. वडील फिल्म डिव्हिजन मध्ये नोकरीला होते. मध्यमवर्गीय म्हणता येईल असे आमचे कुटुंब. लहानपणी मला चित्रपट क्षेत्रात जाण्याची इच्छा होती. वडिलांच्या दृष्टीने चित्रपट क्षेत्र चांगले नव्हते. त्यामुळे ते मला चित्रपट क्षेत्र सोडून दुसरं काही कराव यासाठी आग्रही होते. मला शाळेत असताना त्या चौदा पंधरा वयात चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शन असलं काही कराव वाटतं होतं. काही स्क्रिप्ट मी लिहिली होती. आताही ती माझ्याकडे मिळतील. मात्र ते त्या वयातील प्रभावापूरत ठरलं. माझं गणित खूप चांगल होतं. आवड नसतानाही सायन्स ला गेले. आईने वाटलं तर बारावीत साईड बदलू असा दिलासा दिला होता मात्र असं घडत नाही हे माहित होतं. पुढे मेडिकल ला ऍडमिशन मिळाली. ते करत असताना मी इंजिनियरिंग च्या मुलांना आवड म्हणून गणित शिकवत असे. पुढे MBBS झाले. इंटर्नशिप ला जे जे ला माझे पती बालरोग तज्ञ डॉ. निलेश शिंदे भेटले. त्यांच मुंबई सोडून रत्नागिरी येथे यायचं ठाम मत होतं. मत बदलेल असं मला वाटलं होतं. मात्र लग्न झाल्यावर रत्नागिरी मध्ये आलो. आज मी रत्नागिरी मध्ये आल्यामुळे भाग्यवान आहे असं मला वाटत आणि मुंबई पेक्षा सुद्धा मला इथे समाधान आहे हे अभिमानाने सांगते. दवाखाना सुरु झाला. रत्नागिरी मधील नागरिकांनाचा उत्तम प्रतिसाद लाभला. पती डॉ. निलेश शिंदे यांचा खंबीर पाठिंबा होता. मी स्त्री रोग तज्ञ असून सुद्धा मला महिलांना सेवा देताना अनेक त्रुटी आणि मर्यादा आहेत असं वाटतं होतं. आहे त्या पुढे काही कराव असं वाटतं होतं. मोठी स्वप्न पहा असं मुलाला सांगताना आपण सुद्धा तशी पाहिली पाहिजेत या विचाराने पतीच्या पाठिंब्याने मोठं कर्ज घेऊन कोकणातील पहिले कृत्रिम गर्भधारणा केंद्र रत्नागिरीत सुरु केले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात शिबीरे घेऊन जनजागृती

केली. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आजपर्यंत हजारो कुटुंबाना या माध्यमातून अपत्यप्राप्ती झाली आहे. कृत्रिम गर्भधारणा म्हणजे आपले मूल नाही असा मोठा गैरसमज समाजात आहे. ज्यांना काही समस्या आहेत त्या दूर करून त्याच दांपत्याच कृत्रिमरीत्या गर्भधारणा करून गर्भ वाढवला जातो. क्वचित प्रसंगी गंभीर समस्या असल्यास कुटुंबाना विश्वासात घेऊन विविध उपाय केले जातात. याबाबतच्या विविध सेवा आणि उपचार देत असताना रत्नागिरीकर काळाच्या पुढे विचार करतात आणि त्यांना खूप समज आहे हे जाणवलं.
सध्या तरुण तरुणी हे करिअर च्या मागे असल्याने लग्न उशिरा होतात त्यामुळे मग संततीबाबत प्रश्न निर्माण होतात. त्यांनी त्यातील सुरक्षित मातृत्वाच्या मर्यादा ओळखून त्याच्या आतच मुलांबाबत विचार केला पाहिजे. समस्या बोलल्या पाहिजेत. पती पत्नी आणि कुटुंबात मोकळे वातावरण पाहिजे. बोलून अनेक प्रश्न सुटतात. समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ज्यांना मुले होऊ शकत नाहीत किंवा नाहीत त्यांना समाजात चांगली वागणूक दिली पाहिजे. आपल्या हातात अनेक गोष्टी नसतात. हे समजून घेता आले पाहिजे. अनेक ठिकाणीदेशात परदेशात कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेऊन अभ्यासातून आणि निष्कर्षातून बनवलेले पेपर सादर केले आहेत.
मुलाला फिट असलं पाहिजे असं सांगताना स्वतः फिट असलं पाहिजे. म्हणून सायकल चालवायला सुरुवात केली. क्लब स्थापन केला. २०१७,२०१८, २०१९ मध्ये हातखंबा आणि परत आणि नंतर मिऱ्या आणि परत आणि तिसरी पावस आणि परत अशा पंचवीस किलोमीटर च्या स्पर्धा घेतल्या. स्पर्धेकांकडून एकही रुपया घेतला नाही शिवाय टी शर्ट,टोप्या मेडल दिली. तिसऱ्या वेळी १२०० मेडल आणली होती हरियाणा मधून. मात्र ३०० जणांना मेडल नंतर परत मागवून द्यावी लागली होती. इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर गोव्यात किनारी मार्गाने सायकल रॅली केली .तो खूप भारी अनुभव होता. युरोप मध्ये एक मोठा सायकल ट्रेक केला. तिथे सायकल चालवताना रस्त्यावर माणसे नाहीत आणि इथे खूप माणसे हा मोठा फरक आढळला. आय एम ए रत्नागिरी ची अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव अशी पदे भूषवली आहेत. त्या माध्यमातून अनेक कामे आयोजन सुरु असते.
आशा सेविका या ग्रामीण भागात पालकाचे काम करत असतात. त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो गरोदर स्त्रियांची काळजी कशी घ्यावी. त्यासाठी औषधे गोळ्या बाळांची काळजी याबाबत माहिती देतो. जेणेकरून माता आणि मुले सुदृढ बनावीत.भविष्यात एकाकी आणि परदेशात मुले असलेल्या वृद्धांसाठी त्यांना स्वतःचे घर वाटेल असा वृद्धाश्रम करण्याची इच्छा आहे. माझ्या वाटचालीत पती यांचे प्रोत्साहन आणि खंबीर पाठिंबा महत्वाचा आहे. श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रत्येक हॉस्पिटल मध्ये रुग्णांना कधीही संपर्क साधता येईल अशी सोय असली पाहिजे आणि असते.
तरुणांनी आणि तरुणीनी वेळेवर लग्न करून सुरक्षित वयात आई बाप बनले पाहिजे. तर मुले सुदृढ बनतील. याशिवाय त्यांनी अनेक अनुभव, माहिती, किस्से सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला आवर्जून आलेल्या पावसच्या सौ. कुर्टे यांनी त्यांच्या समस्या असलेल्या मातृत्वाच्या वेळी डॉ. तोरल शिंदे यांनी घेतलेल्या काळजीचा आणि दिलेल्या धीराचा उल्लेख करून सुरक्षित मातृत्वाबाबत त्यांचे आभार मानले.( त्या आपणहून कार्यक्रमासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आल्या होत्या). डॉ तोरल शिंदे यांना मिळालेल्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. तोरल शिंदे यांनी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगून अविनाश काळे यांनी २००३ मध्ये घेतलेल्या आरोग्य शिबिरासाठी आले होते. त्यानंतर २२ वर्षांनी गोळप मध्ये या कार्यक्रमानिमित्त आल्याचे आवर्जून नमूद केले.
यानंतर त्यांचा सन्मान श्रोत्यांमधील नागपूर रहिवासी असलेल्या गोळपच्या सौ.सुषमा गोखले यांच्या हस्ते करून कार्यक्रम संपला.
मुलाखतकार : श्री. अविनाश काळे
९४२२३७२२१२

आणखी वाचा