पोलादपूर, दि. ३० : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोलीतील आई-मुलीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रावसाहेब मार्केड हे आपल्या कुटुंबासह कारने (एमएच ०८ एएन २४३९) मुंबईहून दापोलीकडे येत होते. पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच ०४ एलवाय १६३८) त्यांच्या कारची भरधाव वेगात मागून जोरदार धडक बसली.
धडक इतकी जबरदस्त होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात सुवर्णा मार्केड आणि अनुक्षी अनिल मार्केड यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मार्केड आणि चिन्मय मार्केड हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कार कंटेनरखाली अडकल्याने जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले.
जखमींना तत्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या अनिल मार्केड यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आले असून, चिन्मय मार्केड याला महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे दापोली परिसरात शोककळा पसरली असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलादपूर पोलीस अपघाताचा पुढील तपास करत आहेत.








