परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; मोठा अनर्थ टळला, सर्व रुग्ण सुरक्षित

रत्नागिरी, दि. १ : शहरातील परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी एअर कंडिशनर (एसी) यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

घटनेची माहिती मिळताच डायलिसिस विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या घटनेत कोणत्याही रुग्णाला, नातेवाईकाला किंवा कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही.

रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डायलिसिस सुरू असलेल्या सर्व रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या इतर केंद्रांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले. त्यांच्या उपचारांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली.

सध्या प्रभावित विभागाची संपूर्ण सुरक्षा तपासणी सुरू असून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सर्व सुरक्षा मानकांची पूर्तता करून डायलिसिस सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

या प्रसंगी मदतीसाठी धावून आलेल्या आपत्कालीन सेवा यंत्रणा, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानताना परकार हॉस्पिटल प्रशासनाने, “रुग्णांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असून सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

आणखी वाचा