रत्नागिरी, दि. १ : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. आजअखेर ६ उमेदवारांची एकूण १२ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असून दाखल अर्जांची छाननी मंगळवारी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
या मतदारसंघातील एका जागेसाठी विविध पक्षांसह अपक्षांनीही जोरदार ताकद दाखवली आहे. ३० मे रोजी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला होता. सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ४, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पीजंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, मानसी संतोष म्हात्रे (पीजंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी १ आणि अनिकेत सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी ४ अर्ज दाखल केले. अशा प्रकारे एकूण १२ अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झाले आहेत.

महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सोमवारी समर्थकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. त्यामुळे महायुतीने या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाळ माने यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत ठरण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरून महायुतीत तडजोड झाल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात येणार असून त्याबदल्यात अनिकेत तटकरे यांना विधान परिषद उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा रंगली आहे.
मतदारसंख्येच्या दृष्टीने पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची ताकद अधिक असल्याचे मानले जाते. शिवसेनेकडे ३३४, भाजपकडे २६४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६५ मतदार असल्याने महायुती मजबूत स्थितीत असल्याचे दिसते. मात्र महाविकास आघाडीने मैदानात उतरल्यानंतर निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे.
आता मंगळवारी होणाऱ्या अर्ज छाननीनंतर आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतरच प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार राहणार, हे स्पष्ट होणार असून कोकणातील या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








