आंबा घाटात गॅस टँकर पलटी; गॅस रिफिलिंगसाठी रात्री 10 नंतर वाहतूक राहणार ठप्प

वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी, दि. २७ : नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाट परिसरात एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली असून या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने आज रात्री १० नंतर आंबा घाट मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे आहे. अपघातानंतर आंबा महामार्ग पोलिस मदत केंद्र, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम बुधवार, २७ मे रोजी रात्री १० नंतर करण्यात येणार आहे. गॅस रिफिलिंगच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही धोका उद्भवू नये यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा मार्गे कोल्हापूरकडे जाणारी तसेच कोकणाकडे येणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी कुरुळ – भुईबावडा घाट – गगनबावडा – अनुस्कुरा घाट या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हायवे टँप तसेच संबंधित पोलीस ठाण्यांकडून वाहतूक नियंत्रणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासनाने वाहनचालकांना आंबा घाट परिसर टाळून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. घटना लक्षात घेता संपूर्ण परिसरात सतर्कता बाळगण्यात येत असून गॅस स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक निर्बंध कायम राहणार आहेत.

आणखी वाचा