रत्नागिरी, दि. २६ : माजी विद्यार्थी संघ, मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय ग्रामीण नाईट अंडरआर्म क्रिकेट लीग स्पर्धा उत्साहात आणि रंगतदार वातावरणात पार पडली. २२ ते २४ मे या कालावधीत मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत फातिमा सी फूड्स परटवणे संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर उमर इलेव्हन साखरतर संघाने उपविजेतेपद मिळवले.
अंतिम सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या संघाला २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. यावेळी विविध वैयक्तिक पुरस्कारांनीही खेळाडूंचा गौरव करण्यात आला. अरबाज याला बेस्ट बॅट्समन, सिराज सिद्दिकी याला बेस्ट बॉलर, ओंकार कदम याला मॅन ऑफ द मॅच, तर फिरोज याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे उपविजेता ठरलेल्या उमर इलेव्हन साखरतर संघाने मिळालेल्या बक्षिसातील दोन हजार रुपये शाळेला देणगी देऊन दानशूर वृत्तीचे दर्शन घडवले.
पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रसिद्ध उद्योजक दीपक पवार, मुख्याध्यापिका अंजली पिलणकर, ज्येष्ठ शिक्षक जयसिंग लोहार, सचिन मिरगल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रणजित सुवारे यांच्यासह अच्युत गजभिये, मंदार आचरेकर, योगेश कोरगावकर, प्रणित मेस्त्री, आकाश परीट, सुदेश निवळकर यांनी विशेष मेहनत घेतली. पंच, समालोचक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.








