राज्यात बनावट आयुर्वेदिक औषधांचा काळाबाजार आणि बोगस उपचार केंद्रांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.अनेक ठिकाणी परवानगीशिवाय आयुर्वेदिक उपचार केंद्रे चालवले जात आहेत,तर काही ठिकाणी खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केली जात आहे.नुकतीच राज्यभरातील सात जिल्ह्यांमध्ये १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर धडक कारवाई करून तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा मिसब्रँडेड व आक्षेपार्ह जाहिराती असलेला औषधसाठा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जप्त करण्यात आला.या कारवाईमुळे राज्यातील बनावट औषध व्यवसायाचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही.भ्रामक जाहिराती,अवैध औषध उत्पादन आणि बेकायदेशीर विक्रीविरोधातील कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण केली जाईल.प्रशासनाची ही भूमिका महत्त्वाची असली तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण आणि शहरी भागात ही अजूनही बोगस आयुर्वेदिक उपचार केंद्रे खुलेआम सुरू असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.विशेष म्हणजे आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही बनावट आयुर्वेदिक उपचार केंद्रांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असल्याचे अनेकदा समोर आले आहे.मुंबई शहर आणि उपनगराच्या अनेक भागांमध्ये तसेच गर्दीच्या बाजारपेठांमध्ये अनेक तथाकथित आयुर्वेदिक उपचार केंद्रे दवाखाने लोकांना “हमीशीर उपचार” देण्याच्या नावाखाली लुटत आहेत.काही केंद्रांवर कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेले लोक स्वतःला डॉक्टर किंवा वैद्य म्हणून सादर करतात.मोठमोठे बॅनर,सोशल मीडियावरील जाहिराती आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून “कॅन्सर पूर्ण बरा”, “मधुमेह कायमचा नष्ट”, “किडनी विकारावर खात्रीशीर उपाय”, “गुडघे दुःखीपासून कायमची मुक्तता”, “लठ्ठपणा ७ दिवसांत कमी” अशा प्रकारच्या भ्रामक जाहिराती करून लोकांना जाळ्यात ओढत आहेत.गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक हे कमी खर्चात उपचार मिळतील या आशेने अनेक जण अशा आयुर्वेदिक उपचार केंद्रांकडे वळतात.मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून हजारो,लाखो रुपये उकळले जातात.काही वेळा चुकीची बनावट औषधे दिल्यामुळे रुग्णांची प्रकृती आणखी बिघडते.अनेकांना गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.काही प्रकरणांमध्ये तर वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.आजकाल सोशल मीडिया हे या बोगस व्यवसायाचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे.फेसबुक,यूट्यूब,इंस्टाग्राम आणि विविध वेबसाईट्सवर आकर्षक व्हिडीओ व बनावट अनुभव दाखवून लोकांचा विश्वास संपादन केला जातो.काही जण खोटे रुग्ण उभे करून “आम्ही पूर्ण बरे झालो” अशा प्रतिक्रिया दाखवतात.यामुळे सर्वसामान्य लोक सहजपणे फसतात.विशेषतः गंभीर आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था लक्षात घेऊन त्यांची फसवणूक केली जाते.राज्यातील अनेक बोगस आयुर्वेदिक उपचार केंद्रांमध्ये औषधांची कोणतीही गुणवत्ता तपासणी होत नाही.उत्पादन कुठे तयार झाले,त्यात कोणते घटक आहेत,त्याचा शरीरावर काय परिणाम होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसते.काही ठिकाणी तर बनावट लेबल लावून औषधे विकली जातात.अशा औषधांमुळे यकृत,मूत्रपिंड आणि हृदयाशी संबंधित गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.या वाढत्या प्रकारांमुळे केवळ आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही,तर खऱ्या आयुर्वेद शास्त्राची प्रतिमाही मलिन होत आहे.आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि प्रभावी उपचार पद्धती मानली जाते.मात्र काही बोगस लोकांच्या गैरप्रकारांमुळे संपूर्ण आयुर्वेद व्यवस्थेबद्दल समाजात संशय निर्माण होत आहे.त्यामुळे अशा फसव्या आयुर्वेदिक व्यवसायांवर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.प्रशासनाने केवळ अधूनमधून कारवाई करून थांबता कामा नये.नियमित तपासण्या,परवाना पडताळणी,ऑनलाईन जाहिरातींवर नियंत्रण आणि बोगस आयुर्वेदिक दवाखान्यांवर तातडीने गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.तसेच नागरिकांनीही जागरूक राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे उपचार घेण्यापूर्वी त्यांची अधिकृत नोंदणी,वैद्यकीय पात्रता आणि औषधांचा परवाना तपासणे गरजेचे आहे.संशयास्पद जाहिराती आणि अवैध उपचार केंद्रांची माहिती प्रशासनाला देणे ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक जबाबदारी आहे.जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बनावट औषध माफियांना वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.त्यामुळे सरकार,अन्न व औषध प्रशासन,आरोग्य विभाग आणि नागरिक यांनी एकत्रितपणे या बोगस साखळीविरोधात लढा उभारणे ही काळाची गरज बनली आहे.
– केतन दत्ताराम भोज,घाटकोपर
सदस्य – मराठी वृत्तपत्र लेखक संघ,मुंबई
मो – ८३६९५५४४१८








