पुढील काही दिवसांत मान्सूनचे आगमन; रविवारपासून मुंबईत हलक्या सरींची शक्यता

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; कोकणातही तुटीची शक्यता

मुंबई, दि. ३० : राज्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपत आली असून पुढील काही दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, रविवारपासून मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, यंदाचा संपूर्ण पावसाळा राज्यासाठी तुलनेने कोरडा ठरण्याची शक्यता दुसऱ्या दीर्घकालीन पूर्वानुमानातून व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा राज्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने कमी पाऊस पडू शकतो. विशेषतः कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तूट जाणवण्याची शक्यता आहे. काही भागांत ही तूट ३० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकते.

कोकण विभागात सामान्यतः जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडतो. मात्र, यंदा जून महिन्यातच कोकणात ३३.५ ते ४५ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उकाडा आणि वाढते तापमान यापासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सरासरीइतका पाऊस पडू शकतो, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मोठ्या प्रमाणात तूट जाणवू शकते. जून महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवले जाण्याची शक्यता असल्याने उष्णतेची तीव्रता कायम राहू शकते.

देशपातळीवरही यंदा बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारताचा काही भाग, ईशान्य भारतातील तुरळक क्षेत्रे आणि आग्नेय दिशेतील काही प्रदेश वगळता बहुतांश देशात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मान्सून पुढील सात दिवसांत केरळसह दक्षिण भारतात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर तो हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार असून, रविवारपासून मुंबईत हलक्या सरींची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

आणखी वाचा